उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरील हिमाच्या जाड थरांमुळे पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल टिकून राहतो, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. तथापि येत्या काही दशकांमध्ये हा समतोल बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक तापमानात झपाटय़ाने वाढ होत असल्याने दक्षिण ध्रुवावरील हिमकडे कोसळू लागले आहेत. संशोधकांनी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही अधिक वेगाने दक्षिण ध्रुवाचा ऱहास होत आहे. यामुळे तेथील प्राणी जीवन तर धोक्यात आलेलेच आहे. शिवाय हिम वितळण्याचा हा वेग कायम राहिला तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते, असाही इशारा संशोधकांनी दिला आहे.

1997 पासूनच हिम वितळण्याचा वेग वाढण्यास प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत 12 लाख कोटी टन हिम वितळलेले आहेत. हे प्रमाण अपेक्षेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे समुद्राची पातळी वाढून संपूर्ण जगात सागर तटानजीकची भूमी पाण्याखाली जाऊ शकते. याचे दुष्परिणाम मानवासह सर्व जीवसृष्टीला भोगावे लागणार आहेत. दक्षिण धुवावर दरवर्षी 2000 घन किलोमीटर हिम तयार होत असते. आणि तेवढेच विरघळून समुद्रात मिसळत असते. तथापि गेल्या 10 वर्षांत हिम तयार होण्याच्या प्रमाणापेक्षा ते विरघळण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. परिणामी दक्षिण ध्रुवावरील हिम झपाटय़ाने कमी होत आहे. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविता आले नाही तर पर्यावरणाचा समतोल बिघडून हाहाकार माजण्याची शक्यता आहे. जागतिक तापमान किमान 1 डिग्री सेंटिग्रेडने कमी होणे हाच या ऱहासावर तात्कालिक उपाय आहे. यासाठी तापमानवाढीला अनुकूल ठरणारे उद्योग नियंत्रणाखाली ठेवणे अत्यावश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.









