भविष्यात बेळगावकरांना मोठ्या समस्यांना द्यावे लागणार तोंड
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामध्ये विविध विकासकामे राबविण्यात आली. बरीच कामे पूर्ण झाल्यानंतर देखभालीसाठी महानगरपालिकेकडे ताबा देण्यात आला. मात्र, महानगरपालिका स्मार्ट सिटीने काम केले आहे, त्यामुळे आपली जबाबदारी नाही, असे सांगून आता बेळगावकरांना वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून मनपा आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने घ्यावे आणि शहराची सुव्यवस्था राखावी, अशी मागणी होत आहे.
शहापूर येथील नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंत रस्ता व गटारी करण्यात आल्या. त्या गटारींवर काँक्रीट घालण्यात आले. मात्र, गटारीतील पाणी निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरात शिरत आहे. याचबरोबर गटारी साफ करणेदेखील अवघड झाले आहे. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर बऱ्याच उशिराने महापालिका अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याठिकाणी पाठवून पाहणी करण्याची सूचना केली.
आयुक्तांच्या सूचनेनुसार हे अधिकारी दाखल झाले. मात्र, हे काम स्मार्ट सिटीचे आहे, असे म्हणून ते झटकू लागले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी त्या गटारीची स्वच्छता करण्याची सूचना केली आहे. स्मार्ट सिटीमधील कामे काही प्रमाणात झाली असली तरी गटारींवर काँक्रीट घातल्याने अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शिल्पा, मनपा आरोग्य विभागाचे कलादगी, माने, मुकादम संजय पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









