वृत्तसंस्था / बर्लिन
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताची महिला अॅथलिट अॅन्सी सोजनने महिलांच्या लांब उडी प्रकारात अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
24 वर्षीय अॅन्सीने या क्रीडा प्रकारात पहिल्या प्रयत्नांत 5.97 मी.चे अंतर नोंदविले. अ गटातील झालेल्या पात्रतेसाठीच्या शेवटच्या फेरीत तिने या क्रीडा प्रकारात 6.20 मी.चे अंतर नोंदवित चौथे स्थान घेतले. अंतिम फेरीच्या पात्रतेसाठी एकूण खेळाडूंमध्ये तिने चौथे स्थान राखले. अ गटातून चीनची झियाँग शिक्वीने 6-41 मी.चे अंतर नोंदवित पहिले स्थान, ऑस्ट्रेलियाची समंथा डेल 6.38 मी.चे अंतर नोंवित दुसरे तर जर्मनीच्या समिरा अॅटेरमेयरने 6.22 मी.चे अंतर नोंदवित तिसरे स्थान घेतले. गेल्या मे महिन्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सोजनने रौप्य पदक मिळविले होते.
या स्पर्धेत भारताच्या रुचीत मोरीने पुरुषांच्या 400 मी. अडथळा शर्यतीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पात्र फेरीमध्ये त्याने तिसरे स्थान घेताना 50.58 सेकंदांचा अवधी नोंदविला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी केवळ दोन क्रीडा प्रकार घेण्यात आले.
टेनिस या प्रकारामध्ये भारताच्या वैष्णवी अडकरने महिलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठताना केनियाच्या अँजेला ओकोटोईचा 6-3, 6-4 असा पराभव केला. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांना पहिला दिवस संमिश्र ठरला. भारताच्या मुराद आणि वाघेला यांनी महिला दुहेरीत तर टी. कोटेच्या आणि एस. वाणी यांनी पुरुष दुहेरीत आपले सामने जिंकले. बीच व्हॉलिबॉल या क्रीडा प्रकारात भारताच्या महिला संघाला क गटातील सामन्यात लॅटव्हियाकडून हार पत्करावी लागली. समशेरबाजी या क्रीडा प्रकारात महिलांच्या सांघिक फॉईल प्रकारातील लढतीत पोलंडने भारतीय महिला संघाचा 45-18 अशा गुणांनी तर पोलंडने पुरुषांच्या इपी सांघिक प्रकारात भारताचा 45-33 असा पराभव केला. तायक्वांदो या क्रीडा प्रकारात भारताच्या रिशीता डांगने लेबेनॉनच्या सिलेनीचा 2-0 असा पराभव केला. पुरुषांच्या बास्केटबॉल प्रकारात लॅटव्हियाने भारतावर 111-55 अशा गुणांनी मात केली. यापूर्वी झालेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाने 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 26 पदके मिळवित पदक तक्त्यात सातवे स्थान मिळविले होते.









