गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटप्रेमींच्या विश्वात ‘टिकटॉक’ची धूम आहे. या सॉफ्टवेअरमुळे असंख्य हौशी कलाकारांना त्यांची अभिनय, नृत्य आणि संगीत कला थेट लोकांपर्यंत नेण्याची सोय झाली आहे. ‘टिकटॉक कलाकार’ नामक एक नवा वर्गच समाजात निर्माण झाला असून या लोकप्रिय कलाकारांना पैसेही उत्तम मिळातात. मात्र, हे टिकटॉक आता केवळ मनोरंजनाचे किंवा कला सादरीकरणाचे साधन राहिलेले नाही. त्याचा आणखी एक उपयोग असल्याचेही सिद्ध होत आहे.
कोलंबिया नामक देशात अशी घटना घडली आहे, की जिच्यामुळे टिकटॉकचा हा उपयोग लोकांना समजला. या देशातील डिएगो लंडोनो नामक एक प्रौढ माणूस दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्dयाला विस्मरणाचा (डीमेन्शिया) त्रास होता. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला पुन्हा घरची वाट सापडली नाही आसा तो बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांमध्ये तक्रारही सादर करण्यात आली. तथापि, त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याचा शोध थांबविण्यात आला. त्याच्या कुटुंबियांनीही आशा सोडून दिली. तथापि, दोन वर्षांच्या नंतर हा युवक टिकटॉकमुळे त्याच्या कुटुंबियांना सापडला आहे. एमी सोलानो नामक एक सामाजिक कार्यकर्ती महिला आणि काही सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर्सनी सहज म्हणून त्याचे छायाचित्र घेतले. हे छायाचित्र एका व्हिडीओत समाविष्ट करण्यात आले आणि तो सोशल मिडियावरुन प्रसारित करण्यात आला. तो त्याच्या कुटुंबियांच्या पाहण्यात आल्यानंतर त्यांनी त्याला ओळखले आणि पोलिसांना ही माहिती दिली. ज्यांनी हा व्हिडीओ टिकटॉकवर प्रसिद्ध केला होता, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केला. अशा प्रकारे या प्रौढ व्यक्तीचा शोध
लागला असून त्याला पुन्हा कुटुंबात परत आणण्यात आले आहे.









