श्रीगंगानगरमध्ये पकडले पाकिस्तानी ड्रोन, तपासणीत सापडला शस्त्रसाठा
वृत्तसंस्था/ श्रीगंगानगर
पाकिस्तानने सीमेवरील आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवत असे. पण आता पाकिस्तानने भारताला शस्त्रे आणि अमली पदार्थ पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. राजस्थानमधील श्रीकरणपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन सापडले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हे ड्रोन ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
रविवार, 1 ऑक्टोबर रोजी बीएसएफला भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या या भागात एक संशयास्पद ड्रोन आढळून आला. या ड्रोनला दोन पाकिटे जोडण्यात आली होती. त्यापैकी एका पॅकेटमध्ये आठ राउंड असलेले एक पिस्तूल आणि मॅगझिन सापडले. तर दुसऱ्या पॅकेटमध्ये ड्रग्ज असल्याचा संशय आहे. ड्रोन सापडल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि ड्रग्ज भारतात पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. राजस्थान, पंजाब ते जम्मू-काश्मीरपर्यंत भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन सातत्याने पकडले जात आहेत. बीएसएफला या ड्रोनवर सतत लक्ष ठेवावे लागते. पाकिस्तानी ड्रोन पकडल्याची सर्वाधिक प्रकरणे पंजाबमध्ये नोंदवली जात आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनच्या वाढत्या कारवाया लक्षात घेऊन नवी यंत्रणा आणण्याची तयारीही सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली जाईल असे आश्वासन देत सीमा सुरक्षा मजबूत करण्याची हमी दिली होती. सीमेवरील सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.









