बुधवारी अटक झालेल्या संशयित दहशतवाद्यांशी होता संपर्क
बेंगळूर : बेंगळूर शहरातील विविध ठिकाणी घातपात घडविण्याचा कट केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) उधळून लावला आहे. बुधवारी बेंगळूरमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर सीसीबी पोलिसांनी दावणगेरे येथून आणखी एका संशयिताला अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्रीच ही कारवाई करण्यात आली. फयाज (वय 32) असे त्याचे नाव आहे. अटकेतील पाच जणांशी त्यांचा संपर्क होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. बुधवारी बेंगळूरमध्ये सय्यद सुहेल खान, मोहम्मद फैजल रब्बानी, मोहम्मद उमर, मुदस्सीर पाशा आणि जाहीद तबरेज यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्फोटके व शस्त्रास्त्रs जप्त करण्यात आली होती. या संशयितांची सखोल चौकशी केल्यानंतर फयाजविषयी माहिती हाती लागली. मध्यरात्रीच सीसीबी पोलिसांनी दावणगेरेच्या आझादनगर येथील निवासस्थानावर छापा टाकून फयाजला ताब्यात घेतले. तो पेंटींगचे काम करत होता. बेंगळुरात अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांशी त्यांचा संपर्क असल्याचे समजते. तसेच त्याने पिस्तूल पुरविल्याचा संशयही आहे. फयाज हा दावणगेरेत दुसऱ्या पत्नीसमवेत वास्तव्यास होता. तो मुळचा बेंगळूरमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध ड्रग्जविक्री, बेकायदा शस्त्रास्त्रांची विक्री व इतर प्रकरणांत चार ते पाच गुन्हे नोंद झाले होते. तो जामिनावर बाहेर असल्याचे समजते. आता संशयित दहशतवाद्यांशी त्याचा संपर्क असल्याचे उघडकीस येत आहे.
मास्टरमाईंड अफगाणिस्तानमध्ये?
सीसीबी पोलीस या प्रकरणाविषयी सखोल तपास करत असून या प्रकरणात फरार असणारा जुनैद हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. बेंगळूर शहरात घातपात घडविण्यासाठी त्यानेच व्यूहरचना तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. 2017 मधील अपहरण आणि खूनप्रकरणी त्याच्यासह 21 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी जुनैदचा संपर्क कारागृहातील दहशतवादी नासीर याच्याशी आला. कारागृहातून सुटका झाल्यानंतर 2020 मध्ये रक्तचंदनाच्या चोरटी वाहतूक प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्याने दुबई गाठले. जुनैदचा अफगाणिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्क असल्याचा दाट संशय आहे. अफगाणिस्तानातूनच तो आपल्या टीमला सूचना करीत होता, अशी माहिती सीसीबीच्या पथकाला मिळाली आहे.
दहशतवादी नासीरला ताब्यात घेण्याच्या हालचाली
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुनैदविषयी इंटरपोलला माहिती दिली आहे. दहशतवादी कृत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांसह जुनैदला कारागृहात प्रशिक्षण दिलेल्या दहशतवादी नासीर याला बॉडी वॉरंटवर ताब्यात घेण्याच्या हालचाली सीसीबी पोलिसांनी सुरू केल्या आहेत.









