चिपळूण :
अजित यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशावरून शिंदे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत मित्रपक्ष राष्ट्रवादीला इशारा दिलेला असतानाच रविवारी उत्तर रत्नागिरीच्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुकाप्रमुख शरद शिगवण यांच्यासह दोन विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांसह आठ शाखाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून घेतला. फोडाफोडीच्या या राजकारणामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रविवारी चिपळुणात आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून मित्रपक्षाला सुनावताना सध्या मित्रपक्ष आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत नाही. यशवंतराव यांना प्रवेश देताना किमान मित्रपक्ष म्हणून आमच्याशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र तसे केले गेले नाही. त्यामुळे आमच्या मतदारसंघात येऊन आमच्याशी चर्चा न करता कोणी परस्पर निर्णय घेणार असेल तर त्यांना तसेच उत्तर दिले जाईल, असा इशारा देतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची ‘ऑफर’ दिल्याचे सामंत यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु, पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केल्यानंतरही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सामंत यांच्याच शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिगवण यांच्यासह त्यांच्या समर्थकांना आपल्या पक्षात घेतले आहे.
रविवारी खेड येथे प्रदेशाध्यक्ष तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितिन ठसाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिगवण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. शिगवण हे अडीच वर्षापूर्वी ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत आले. शिवसेनेत त्यांनी उपतालुकाप्रमुखासह पंचायत समितीचे उपसभापतीपदही भूषवलेले आहे. सध्या ते गुहागर विधानसभा मतदारसंघातील 72 गावांसाठी तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. विकासकामे होत नसल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी आपण तालुका सचिव सचिन घाणेकर, युवासेना तालुका उपाध्यक्ष शरद भुवड, विभागप्रमुख योगेश खेडेकर, रमेश नेवरेकर, उपविभागप्रमुख अनंद कोदारे, संतोष आगरे, शाखाप्रमुख संदीप कदम, काशिनाथ भागडे, सुरेश जावळे, अंकुश घेवडे, रामा रहाटे, प्रमोद म्हापर्ले, सचिन भुवड आदी पदाधिकाऱ्यांसमवेत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला केला असल्याचे शिगवण यांनी सांगितले.








