वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ भारताविरुद्ध मालिकेतून बाहेर
वृत्तसंस्था/ त्रिनिदाद
टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का बसला आहे. शमार जोसेफपाठोपाठ सहकारी वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. अल्झारीच्या जागी जेडिया ब्लेड्सचा संघात समावेश करण्यात आला असल्याची माहिती विंडीज क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. मात्र सामन्याच्या 3 दिवसांआधी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. जोसेफला कंबरेच्या खालील भागात त्रास जाणवत असल्याने या मालिकेत खेळता येणार नाही. मागील काही दिवसापासून जोसेफला कंबर आणि पाठदुखीचा त्रास होता. यासाठी आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यांमधून त्याच्या जुन्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाल्याचे विंडीज बोर्डाने सांगितले. जोसेफवर आता उपचार सुरु असून लवकरच तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा आशावाद विंडीजा बोर्डाने व्यक्त केला आहे.
जेडिया ब्लेड्स नवा चेहरा
वेस्ट इंडिजने जोसेफच्या जागी 23 वर्षीय वेगवान गोलंदाज जेडिया ब्लेड्सला संघात स्थान दिले आहे. ब्लेड्स सध्या यूएईमध्ये आहे आणि मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर भारतात परतेल. ब्लेड्सने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. तथापि, त्याने 3 एकदिवसीय आणि 4 टी 20 सामने खेळले आहेत. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 13 सामन्यांमध्ये 35.91 च्या सरासरीने 35 बळी घेतले. यामुळे टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करण्यास तो उत्सुक असेल.









