मनपाला बसला पुन्हा दणका : खंजर गल्ली-जालगार गल्ली येथील खासगी जागेत केला होता रस्ता
बेळगाव : गेल्या पंधरा वर्षांपूर्वी खासगी जागेतून खंजर गल्ली आणि जालगार गल्ली येथे रस्ता करण्यात आला होता. मात्र त्या जागामालकाने आपली जागा परत मिळावी यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने संबंधित जागामालकाला ती जागा परत करावी, असा आदेश दिला. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ती जागा परत केली आहे. यामुळे महानगरपालिकेला आणखी एक दणका बसला आहे. खंजर गल्ली-जालगार गल्ली येथील खासगी जागेमधून रस्ता करण्यात आला होता. मकबूल आगा यांची 800 स्क्वेअर फूट जागा होती. त्या जागेतून रस्ता करण्यात आला होता. मात्र रस्ता केल्यानंतर त्या जागेची नुकसानभरपाईही दिली नाही आणि त्याचा गैरवापरही केला जात होता. यामुळे मकबूल आगा यांनी येथील दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता.न्यायालयाने संबंधित जागामालकाला ती जागा परत द्यावी, असा आदेश दिला. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्या ठिकाणी जाऊन सदर जागा मालकाच्या ताब्यात दिली आहे. यावेळी त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचबरोबर मोठी गर्दीही झाली होती.









