आयआयएम कोलकाताच्या वसतिगृहातील प्रकार; आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ कोलकाता
आयआयएम कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थिनीवर कॅम्पसमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपीने समुपदेशनाच्या नावाखाली मुलीला वसतिगृहात बोलावून नंतर तिच्या जेवणात आणि पेयांमध्ये मादक पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीने समुपदेशन सत्राच्या बहाण्याने मुलीला मुलांच्या वसतिगृहात बोलावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडितेने शुक्रवारी संध्याकाळी हरिदेवपूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. समुपदेशन सत्राच्या बहाण्याने विद्यार्थिनीला मुलांच्या वसतिगृहात बोलावून तेथे तिला पिझ्झा आणि सॉफ्ट ड्रिंक देण्यात आले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. मात्र, शुद्धीवर आल्यानंतर विद्यार्थिनीने स्वत:वर बलात्कार झाल्याचा दावा केला. तसेच आरोपीने आपल्याला ‘यासंबंधी कोणासमोर वाच्यता केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील’, असे धमकावल्याचा आरोपही केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अलिकडच्या काळातील पश्चिम बंगालमधील बलात्काराची ही तिसरी घटना आहे. शनिवारी घडलेली ही घटना दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्येच झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर सुमारे दोन आठवड्यांनी उघडकीस आली आहे. लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराचा हा प्रकार 25 जूनचा आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. सध्या त्या प्रकरणातील चारही आरोपी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत आहेत.









