कोल्हापूर :
गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झालेल्या आणखी एका वृद्धाचा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बाळगोंडा पाटील (वय 64, रा. डोणेवाडी) असे त्यांचे नाव आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू हेते. त्यांची प्रकृती खालावत गेल्याने शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.
जीबीएसची लागण झालेल्या दोन रूग्णांचा उपचार सुरू असताना पाठोपाठ मृत्यू झाल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे. सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मृत बाळगोंडा पाटील यांना शनिवार दि.8 रोजी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. आयजीएम रूग्णालयातून नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. सीपीआरमधील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना जीबीएस झाल्याचे स्पष्ट झाले.
तत्काळ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचाराला सुरूवात केली. गेले आठ दिवस व्हेंटिलेटरसह इतर औषधोपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची अचानक तब्येत खालावत गेली. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शनिवारी सकाळी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.








