उत्तर प्रदेश-बिहारसह 13 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
वृत्तसंस्था/ डेहराडून, नवी दिल्ली
उत्तराखंडमधील ऊद्रप्रयागमध्ये शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्याच आठवड्यात येथे संततधार पावसानंतर दरडी कोसळण्याच्या दोन-तीन घटना घडल्या होत्या. आता केदारनाथ यात्रेच्या मार्गावर नव्याने दुर्घटना घडली आहे. डोंगरावरून मोठमोठे दगड पडल्याने एक कार त्यात गाडली गेली. तब्बल 12 तासांच्या प्रयत्नानंतर हा ढिगारा हटवण्यात आला. शनिवारी कारमध्ये पाच मृतदेह आढळून आले. हे सर्वजण गुजरातमधून केदारनाथच्या दर्शनासाठी आले होते. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब या ईशान्येकडील राज्यांसह 13 राज्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस बरसत असून नैसर्गिक आपत्तींच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. मंडीपासून सहा मैलांवर चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा चालत्या अल्टो कारवर दरड कोसळल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तसेच अन्यत्रही छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. उत्तराखंडबरोबरच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.