कुपवाडात चकमक : एका दहशतवाद्याचा खात्मा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील कोवूत भागात बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात आणखी एक जवान हुतात्मा झाला आहे. नॉन-कमिशन्ड ऑफिसर दिलावर सिंग यांचा ऊग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. याआधी मंगळवारी पुंछमध्ये झालेल्या चकमकीत लान्स नाईक सुभाष कुमार हुतात्मा झाले होते. कुपवाडामधील कोवूत भागात काही दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मंगळवारी लष्कराला प्राप्त झाली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. दिलावर सिंग यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. याचदरम्यान जवानांनी एका दहशतवाद्याला चकमकीत ठार केले. जुलै 2024 मध्ये आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 8 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. यात एकूण 13 जवान हुतात्मा झाले, तर सुरक्षा जवानांनी 12 दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील एलओसीजवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये लान्स नाईक सुभाष कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.









