न्यूयॉर्क
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी गायब होणे किंवा त्यांच्यावर हल्ला होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तेथे सातत्याने भारतीयांना लक्ष्य केले जात आहे. आता कॅलिफोर्नियात 23 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी गायब झाली आहे. या विद्यार्थिनीचा मागील आठवड्यापासून थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी या विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे.
कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी सॅन बर्नार्डिनोची विद्यार्थिनी नितिशा कंडुला 28 मेपासून बेपत्ता आहेत. नितिशा अखेरची लॉस एंजिलिसमध्ये दिसून आली होती. त्यानंतर 30 मे रोजी ती बेपत्ता असल्याचे समोर आल्याची माहिती सीएसयूएसबीचे पोलीस प्रमुख जॉन गुटेरेज यांनी दिली आहे.
विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक क्रमांक जारी केला आहे. नितिशाविषयी कुणालाही माहिती मिळाल्यास त्याने या क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नितिशा ही टोयोटा कोरोला कार चालवत होती, असे पोलिसांना समजले आहे.
चालू वर्षात अमेरिकेत 7 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे तेथे राहत असलेल्या भारतीय समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.