वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
मद्य धोरण प्रकरणी तुऊंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत न्यायालयाने पुन्हा एकदा वाढ केली आहे. ते आता ईडीच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत तर सीबीआयच्या कोठडीत 29 एप्रिलपर्यंत राहणार आहेत. जामीन मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच मंगळवार, 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
मनीष सिसोदिया हे मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या ताब्यात आहेत. आठ तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारीला सीबीआयने त्यांना अटक केली होती. मद्य धोरणाच्या बाबतीत मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरू आहे. त्याचबरोबर अनियमिततेच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या दोन्ही प्रकरणातील सिसोदिया यांची कोठडी सोमवारी संपत होती. 3 एप्रिल रोजी न्यायालयाने सिसोदिया यांना 17 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी दिली होती. दोन दिवसांनंतर, 5 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना 17 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.
सीबीआयने 17 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधी सीबीआय आणि नंतर ईडीने अटक केली. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या जामिनावर 18 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सिसोदिया यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाली आहे.









