काश्मीर फ्रीडम फायटर्स संघटनेने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था / श्रीनगर
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 40 वषीय संजय शर्मा आपल्या पत्नीसोबत सकाळी 10.30 वाजता बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच स्थानिक लोकही रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्यामुळे काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
संजय शर्मा हा अचन गावचा रहिवासी असून तो बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता. संजय शर्मा यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेने एक संदेश जारी करत सकाळी आम्ही अचन पुलवामा येथील रहिवासी काशिनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मा याला संपवल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी या संघटनेने ऑक्टोबर 2022 मध्ये शोपियानच्या चौधरीगुंड गावात काश्मिरी पंडित पोरान कृष्णन यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
रविवारी घडलेली टार्गेट किलिंग ऑक्टोबर 2022 नंतरची काश्मीर खोऱयातील मोठी घटना आहे. यापूर्वी जम्मूच्या राजौरी येथील अप्पर डांगरी गावात 1 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी दोन अज्ञात लोक घुसले होते. विचारणा करून त्यांनी हिंदूंना गोळय़ा घातल्या. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला होता.









