मंदिराच्या भिंतीवर ‘टार्गेट मोदी’ असा संदेश
वृत्तसंस्था/ मेलबर्न
केवळ 6 दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये आणखी एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया प्रांताच्या अंतर्गत येणाऱया मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. पहिल्या घटनेप्रमाणे या मंदिराच्या भिंतींवरही हिंदूविरोधी घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. यावेळी मेलबर्नच्या श्री शिव विष्णू मंदिराला खलिस्तान समर्थकांनी लक्ष्य केले आहे. यापूर्वी बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात तोडफोड करण्यात आली होती.
मेलबर्नच्या या भागात मोठय़ा संख्येत तमिळ हिंदूंचे वास्तव्य आहे. मंदिरातील तोडफोडीप्रकरणी हिंदू समुदायाने व्हिक्टोरिया प्रमुख डॅन ऍन्ड्रय़ू आणि पोलिसांकडे दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
व्हिक्टोरिया हा सर्व संस्कृतींचा आदर करणारा प्रांत असून येथे द्वेषाला कुठलाच थारा नाही.या घटनेत मंदिराच्या भिंतींवर लिहिण्यात आलेल्या मजकुराद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती व्हिक्टोरियन लिबरल पार्टीचे खासदार ब्रॅड बॅटिन यांनी दिली आहे.
मेलबर्नमध्ये 15 जानेवारी रोजी खलिस्तान समर्थकांनी रॅलीचे आयोजन केले होते. ही एक कार रॅली होती आणि याला फारच कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. दुसऱयांदा मंदिरात तोडफोड झाल्याने हिंदू समुदाय निराश झाला आहे. हा प्रकार खलिस्तान समर्थकांकडून करण्यात आल्याचे हिंदू परिषद व्हिक्टोरिया चॅप्टरचे प्रमुख मकरंद भागवत यांनी सांगितले आहे.









