आठवड्यातून दोन दिवस प्रवाशांची होणार सोय
बेळगाव : बेळगाव-हैदराबाद दरम्यान नवीन विमानफेरीला बुधवारपासून प्रारंभ झाला. स्टार एअरलाईन्सची नवीन फेरी सुरू झाल्याने आता हैदराबादला जाण्यासाठी दोन विमानफेऱ्या उपलब्ध होणार आहेत. बुधवारी बेळगाव विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करून विमानफेरीचा प्रारंभ झाला. बेळगाव-हैदराबाद या मार्गावर यापूर्वी इंडिगोकडून दैनंदिन सेवा दिली जात होती. हैदराबाद येथून देशातील अनेक शहरांना कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळत होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरलाईन्सने बेळगाव-हैदराबाद मार्गावर विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस विमानसेवा दिली जाणार आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्या हस्ते प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. केक कापून नव्या विमानफेरीचे स्वागत झाले. हैदराबादला अतिरिक्त फेरी सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.









