कुनोमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू : केवळ 14 चित्ते शिल्लक
वृत्तसंस्था/ कुनो
केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पाला आणखी एक झटका बसला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. धात्री (टिबिलिसी) ही मादी चित्ता बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करून अहवाल मागवण्यात आला आहे. आता कुनो नॅशनल पार्कमध्ये 14 चित्ते आणि एक शावक शिल्लक आहे.
26 मार्चपासून आतापर्यंत 3 शावकांसह 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा मोठ्या चित्त्यांसह तीन शावकांचा समावेश आहे. या चित्त्यांना दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. चित्त्यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानेही यावर चिंता व्यक्त केली होती. कुनो नॅशनल पार्कमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मादी चित्त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या सुमारे 40 टक्के चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यांना भारतात येऊन एक वर्षही झाले नसल्यामुळे चित्त्यांचा मृत्यू हा चिंतेचा विषय ठरत आहे.
चित्त्यांच्या मृत्यूची मालिका 26 मार्चपासून सुरू झाली. सुरुवातीला 4 वर्षांची मादी चित्ता साशा मरण पावली. त्यावेळी मृत्यूचे कारण किडनी इन्फेक्शन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, साशाला नामिबियातून किडनीचा आजार असल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर 2 एप्रिल रोजी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून चित्त्यांच्या मृत्यूची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही.
तज्ञांकडून वेळोवेळी तपासणी
कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या शिल्लक राहिलेले 14 चित्ते (सात नर आणि सहा मादी आणि एक मादी शावक) निरोगी असल्याचा दावा केला जात आहे. कुनो आणि नामिबियाच्या तज्ञांच्या वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. नामिबियाचे तज्ञ आणि कुनो वन्यजीव डॉक्टर आणि व्यवस्थापन पथक या दोन मादी चित्त्यांवर लक्ष ठेऊन असते.
चित्ता संवर्धन प्रकल्प अडचणीत
1952 पासून देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा अस्तित्वात आणण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये 91 कोटी ऊपयांपेक्षा जास्त बजेट असलेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुनो येथे चित्त्याची पिल्ले जन्माला आल्यानंतर हा प्रकल्प यशस्वी होताना दिसत होता, मात्र गेल्या चार महिन्यांपासून एकामागून एक चित्त्यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे आता चित्ता प्रकल्प अडचणीत येताना दिसत आहे.









