पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील ऑनलाइन प्रवेशासाठी पालकांना 22 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदतवाढ असून पालकांनी या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
आरटीई प्रवेशासाठी पालकांना 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत आता 22 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ही मुदतवाढ अंतिम असल्याने पालकांना या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. तसेच निर्धारित कालावधीनंतर प्रवेश ग्राह्य धरला जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.
आरटीईच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्याने प्रवेशासाठी आत्तापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी सुरुवातीला तांत्रिक अडथळय़ांमुळे पालकांना पुरेसा अवधी देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी सांगितले होते. मात्र, यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू होती.
‘आरटीई’ अंतर्गत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल झाले होते. ऑनलाइन लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर झालेला आहे. प्रतीक्षा यादीत 81 हजार 127 बालकांचा समावेश आहे. पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून 58 हजार 114 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निशात झालेले आहेत.








