अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात भारताच्या आणखी एका शत्रूची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हत्या केली आहे. जमियत-ए-उलेमा-इस्लामच्या कारी शहजादची हत्या करण्यात आली आहे. कराचीच्या खैराबाद येथे सोमवारी सकाळी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तो मारला गेला आहे. जेयूआय-एफ विरोधात टार्गेटेड किलिंग सातत्याने जारी असून बहुतांश हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासानने घेतली आहे. कारी शहजाद हा भारताच्या विरोधात कट्टरवाद्यांना चिथावणी देण्यासाठी देखील ओळखला जायचा.
पाकिस्तानातील राजकीय संघटना जमियत उलेमा इस्लामच्या प्रमुखाने पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर पक्षाच्या नेत्यांच्या हत्येचे सत्र सुरू झाले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या इशाऱ्यावर दहशतवादी संघटना या नेत्यांची हत्या करत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी सैन्याच्या निशाण्यावर पक्षप्रमुख फजल उर रहमान देखील आहेत.









