केंद्रबिंदू नेपाळमध्येच : तीन दिवसातील दुसरी घटना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, काठमांडू
दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यांसह नेपाळमध्ये सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. गेल्या तीन दिवसातील भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. या भूकंपामुळे कोणत्याही ठिकाणी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद झालेली नाही. मात्र, दिवसाढवळ्या जाणवलेल्या या धक्क्यांमुळे लोकांनी बचावासाठी मोकळ्या मैदानात धाव घेतल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून आले.
यापूर्वी शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्रही नेपाळमध्येच होते. या भूकंपाचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले होते. शुक्रवारी झालेल्या या भूकंपात 153 जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 22 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.
भूकंपाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भूकंपांबाबत सावधगिरीचा अलर्ट जारी केला आहे. यानुसार, भूकंपाची जाणीव झाल्यास घाबरू नका, शांत राहा आणि टेबलाखाली जा, असा सल्ला देण्यात आला आहे. घर किंवा कार्यालयात असल्यास आपले डोके एका हाताने झाकून ठेवा आणि हादरे थांबेपर्यंत टेबल धरून बसा असे सांगण्यात आले आहे. तसेच संधी मिळाल्यास मोकळ्या जागेत जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे.









