धार्मिक भावना भडकवल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाकुंभावरील त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष देव प्रकाश सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सपा खासदाराने आपल्या पदाच्या प्रतिष्ठेविरुद्ध जाऊन महाकुंभमेळ्यावर भाष्य केल्यामुळे सनातनींच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी ऋषी-मुनींविरुद्ध अश्लील टिप्पणी केली होती.
खासदार अफजल अन्सारी यांच्याविरुद्ध गाजीपूरच्या शादियाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध कलम 299 आणि कलम 353 (2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. गाजीपूर एसपींनी एफआयआरबाबत दुजोरा दिला आहे.









