अनगोळ येथे वादंग : पोलीस बंदोबस्तात वाढ, दोन गटांत पुन्हा अंतर्गत धुसफूस
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून दोन गटांत पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पुतळ्याचे लोकार्पण करण्यात यावे, असे बुधवार दि. 1 रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. पण एका गटाने गुरुवारी अचानक चौथऱ्याचे वास्तूपूजन आणि होमहवन कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे चौथऱ्याचे काम अर्धवट असताना घाईघाईने संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येऊ नये, अशी मागणी दुसऱ्या गटाने केली. पुतळा परिसरात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सदर चौथऱ्याचे काम अद्यापही सुरूच आहे. मात्र, यापूर्वी देखील अनेकवेळा पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न झाला होता. पुतळ्याचे लोकार्पण करताना सर्वांना विश्वासात घेण्यात यावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पण एका गटाकडून 5 जानेवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ग्रामस्थांची बैठक पार पडली. काम अर्धवट असतानाही 5 तारखेला पुतळ्याचे लोकार्पण करणे उचित होणार नाही. सर्व काम पूर्ण झाल्यानंतरच भव्यदिव्य प्रमाणात पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. पण गुरुवारी सकाळी अचानक दुसऱ्या गटाने चौथऱ्याची वास्तुशांती आणि होमहवनाचा कार्यक्रम आयोजित केला. ही माहिती समजताच दुसऱ्या गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुतळा आवारात जमा झाले. पण पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्यात येत होते. त्यानंतर ग्रामस्थांनी महानगरपालिकेत जाऊन आपली लेखी तक्रार दिली.
महापौर आणि उपमहापौर चौथऱ्याचे वास्तूपूजन आणि होमहवन कार्यक्रमाला उपस्थित आहेत, अशी माहिती कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे महापालिकेत गेलेले कार्यकर्ते पुन्हा चौथऱ्याच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी महापौर, उपमहापौरांची भेट घेऊन ग्रामस्थांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले. छत्रपती संभाजी महाराज पुतळा हा कोणा एकट्याची मालमत्ता नसून सर्वांनी एकत्रितरित्या मोठ्या दिमाखात लोकार्पण सोहळा पार पाडू. पण इतक्या घाईगडबडीत लोकार्पण करण्यात येऊ नये, असे ग्रामस्थ व तरुणांकडून सांगण्यात येत होते. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या गटाकडून धार्मिक विधी सुरूच ठेवण्यात आले. चौथऱ्याच्या आवारात दोन्ही गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.









