इस्माईल हनियाच्या हत्येनंतर हल्लासत्र सुरूच
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांमध्ये हमासचे मोठे नुकसान होत आहे. शनिवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा आणखी एक वरिष्ठ कमांडर ठार झाला. याशिवाय या हल्ल्यात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. हनियाच्या हत्येनंतर इस्रायलने हवाई हल्ले सुरूच ठेवले असून शनिवारी एका वाहनावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात ठार झालेल्या इतर लोकांची ओळख पटलेली नाही.
पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील तुलकारमच्या आसपासच्या दहशतवादी सेलवर हवाई हल्ला केला. आमच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ब्रिगेडचा एक कमांडर मारला गेला, असे हमासने सांगितले. यापूर्वी बुधवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हनिया यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, इस्रायलने अद्याप याची जबाबदारी घेतलेली नसून त्याबाबत नेमकी स्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही









