► वृत्तसंस्था / पाटणा
बिहार राज्याच्या सिवान जिल्ह्यात आणखी एक पूल कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये अशाप्रकारे या राज्यात सात पूल कोसळले आहेत. सिवान येथील पूल छोटा होता. मात्र, या पुलामुळे जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा संपर्क महाराजगंज या जिल्ह्याशी केला जात होता, आता हा संपर्क तुटला आहे.
या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पूल कोसळला तेव्हा त्यावरुन कोणीही जात-येत नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सिवान जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांमध्ये पूल कोसळल्याची ही दुसरी घटना आहे, अशी माहिती देण्यात आली. या पुलाची निर्मिती 1982-1983 मध्ये करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी या पुलाला भेगा पडल्याचे दिसून आल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. हे काम होत असतानाच तो बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या आसपास कोसळला. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे सेतूचा पाया खचला असावा, असे अनुमान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.









