ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्वपूर्ण निकाल देत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुपूर्द केले. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरुपात मिळालेले मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आता फक्त कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे.
निवडणुकीच्या ऑर्डरनुसार, कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीनंतर म्हणजेच 26 फेब्रुवारीनंतर ठाकरे गटाला दिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा निवडणूक आयोगात जाणार आहे. आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव नियमित करावे, अशी मागणी ठाकरे गट करणार आहे.
अधिक वाचा : भाजपने आता निवडणूक आयोगालाही कच्छपी लावले
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्टे आणल्यास दोन्ही गटाची आधीची नावे आणि चिन्ह नियमित राहतील, असे घटनातज्ञांचे मत आहे.