नागालँडमधील पक्षाचे 7 आमदार अजित पवारांच्या गटासोबत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महाराष्ट्रानंतर शरद पवारांना आता नागालँडमध्येही झटका बसला आहे. तेथील पक्षाचे 7 आमदार अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवारांचा गट सामील झाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटाने पक्षावरच स्वत:चा दावा केला आहे. अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी नागालँडशी संबंधित घडामोडींची माहिती दिली आहे. नागालँडमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी दिल्लीत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत नागालँडमधील आमदारांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. 7 आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांची समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे त्यांनी सोपविली आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या नागालँड प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा शाखांना पूर्वीप्रमाणेच कार्य करण्याचा निर्देश दिला आहे. अजित पवार आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.









