27 ऑगस्टपर्यंत वाढली न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने अबकारी धोरण घोटाळ्यासंबंधी सीबीआयकडून नोंद गुन्ह्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याची न्यायालयीन कोठडी मंगळवारी समाप्त होणार असल्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांची कोठडी वाढविण्याचा निर्णय दिला आहे.
न्यायालय 27 ऑगस्ट रोजी केजरीवालांच्या विरोधात सीबीआयकडून दाखल पुरवणी आरोपपत्रावर विचार करू शकते. केजरीवालांना घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वप्रथम ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक केली होती. ज्याच्या काही तासांनीच दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्याची त्यांची मागणी फेटाळली होती.
12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच त्यांच्या अटकेच्या आवश्यकतेच्या पैलूवर विचार करण्यासाठी हा मुद्दा मोठ्या पीठाकडे सोपविला होता. परंतु सीबीआयच्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याने केजरीवाल अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.









