पीटीआय अध्यक्ष गौहर खान यांना अटक
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गौहर खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे माजी प्रमुख इम्रान खान हे मागील वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. रविवारी पीटीआय कार्यकर्ते आणि नेत्यांनी इम्रान खान यांच्या मुक्ततेवरून इस्लामाबादमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी गोळीबार करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला होता.
पीटीआय नेते गौहर खान, शेर अफजल खान मारवात आणि इतरांना पोलिसांनी सोमवारी रात्री पाकिस्तानच्या संसदेबाहेरून अटक केली आहे. माझे पूर्ण आयुष्य तुरुंगात घालविण्यास मी तयार आहे, परंतु खऱ्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या संघर्षाशी कधीच तडजोड करणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. नजराणा भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यावर मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत.









