केवळ एका बंदरातून संबंधित सामग्रीची वाहतूक करण्यास मंजुरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने बांगलादेशमधून सर्व भूमार्गांद्वारे होणाऱ्या काही सामग्रीच्या आयातीवर बंदी घातली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून जारी आदेशानुसार भारत-बांगलादेश सीमेवर कुठल्याही सीमाचौकीतून प्रतिबंधित सामग्रीला आयात करण्याची अनुमती दिली जाणार नाही. तर केवळ मुंबई येथील न्हावा शेवा बंदरातूनच बांगलादेशमधून या सामग्रीच्या आयातीला मंजुरी देण्यात आली आहे. बांगलादेशातून ज्या सामग्रीच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात ब्लीच्ड आणि ब्लीचशिवाय विणलेले कपडे, सुतळी, जूटचा दोरखंड, जूटच्या पोत्या आणि पिशव्या इत्यादी सामील आहे.
हे निर्बंध विदेश व्यापार (विकास आणि विनियमन) अधिनियम 1992 द्वारे प्राप्त शक्तींच्या अंतर्गत लागू करण्यात येत असल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. परंतु आदेशात नव्या निर्णयामागील कारणांचा उल्लेख नाही. परंतु सरकारकडून अशाप्रकारच्या उपाययोजना अनेकदा गुणवत्ता नियंत्रण, व्यापार संतुलनसंबंधी चिंता किंवा देशांतर्गत उद्योगांच्या सुरक्षेशी निगडित असतात. भारत सरकारचे अतिरिक्त सचिव आणि विदेश व्यापार महासंचालक अजय भादू यांची स्वाक्षरी असलेला हा आदेश त्वरित लागू झाला आहे.
भारतावर आयातशुल्क, बांगलादेशला लाभ
जूट क्षेत्र ऐतिहासिक स्वरुपात भारत-बांगलादेश व्यापार संबंधांमध्ये एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे, कारण दोन्ही देश जूट उत्पादनांचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत. बांगलादेश वस्त्राsद्योगत भारतासोबत प्रतिस्पर्धा करतो आणि आता अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के आयातशुल्क लादण्यात आल्याने बांगलादेशला मोठा लाभ होणार आहे. 2023-24 मध्ये बांगलादेशला भारताची निर्यात 11.46 अब्ज डॉलर्सची राहिली, तर आयात 2 अब्ज डॉलर्स इतकी होती.









