विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
मडगाव : भाजप सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ऊपये 50 ने वाढल्याने प्रत्येक सिलेंडरसाठी आता 1117 मोजावे लागतील तर व्यावसायिक सिलिंडर ऊपये 350 वाढल्याने आता एका सिलिंडरसाठी ऊपये 2118 द्यावे लागतील. एकंदर परिस्थिती पाहता आता सुशिक्षित बेरोजगार तऊणांना पकोडे तळणेही कठीण होईल, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे. भाजप सरकारने घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या केलेल्या दरवाढीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार सातत्याने जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा गंभीर आरोप केला.
खाद्यपदार्थ ही महाग होईल…
या दरवाढीमुळे घरघुती बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. असंवेदनशील भाजप सरकारने मध्यमवर्गीय आणि गरीबांवर लादलेली ही आर्थिक आणिबाणी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रातील किमतीत वाढ होईल. आजची दरवाढ पाहिल्यास भाजप सरकार लोकांना उपाशी ठेवू इच्छित आहे, असे स्पष्टपणे जाणवते असा दावा युरी आलेमाव यांनी केला. गोमंतकीयांनी आजची एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्याची घोषणा करण्याची वेळ लक्षात घ्यावी. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि 2 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर होतील. या तीन राज्यांतील लोकांना निवडणुकीपूर्वी भाजपकडून जुमल्यांचे आमिष दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात निकालाच्या एक दिवस आधी एलपीजीचे दर वाढविण्यात आले आहेत. भाजप सरकार इंधन व गॅस सिलींडर दरवाढ वारंवार आणि सातत्याने करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.









