निवडणूक लढविणार नसल्याची माजी मंत्री आनंदसिंग यांची घोषणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीवेळी राज्य भाजपमधील ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्ती जाहीर होती. आता माजी मंत्री आनंदसिंग यांनी निवडणूक राजकारणातून दूर राहण्याची घोषणा केली आहे.
होस्पेट मतदारसंघातून एका पोटनिवडणुकीसह चार निवडणुकांमध्ये विधनसभा निवडणूक जिंकलेल्या आनंदसिंग यांना मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्याऐवजी त्यांचे पुत्र सिद्धार्थ सिंग यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, सिद्धार्थ पराभूत झाले. 2024 मधील लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला विधानसभेसाठी तिकीट मिळवून दिले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आनंदसिंग मुलाचा विधानसभा निवडणुकीतील पराभव राज्य भाजपसाठी धक्कादायक होता.
आता लोकसभा निवडणुकीसाठी कोप्पळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आनंदसिंग यांनी पक्षाने कोणालाही तिकीट दिले तरी त्याला निवडून आणण्यासाठी परिश्रम घेईल. मात्र, मी निवडणूक लढवणार नाही. तीन वर्षांपूर्वीही हेच सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बळ्ळारी-विजयनगर भागात भाजपला बळकटी देण्यात श्रीरामुलू, जनार्दन रेड्डी r यांच्याप्रमाणेच आनंदसिंग यांनीही योगदान दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाल्याने त्यांची येथील राजकारणावरील पकड ढिली पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारण आणि प्रसारमाध्यामांपासून दूर होते. आता निवडणूक राजकारणातून दूर राहण्याची भाषा त्यांनी केली आहे.









