63 जवानांचा समावेश : मराठा लाईट इन्फंट्रीमधून प्रशिक्षण
बेळगाव : अग्निवीर जवानांची दुसरी तुकडी मंगळवारी देशसेवेत रुजू झाली. बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमधून 63 जवानांनी 31 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले. या अग्निवीर जवानांना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशसेवेची शपथ देण्यात आली. जवानांनी सादर केलेल्या नेत्रदीपक पथसंचलनाने लष्करी अधिकारी व अग्निवीरांचे कुटुंबीय भारावून गेले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. ‘अग्निवीर’ योजनेंतर्गत बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये जवानांना प्रशिक्षण देण्यात आले. या जवानांनी शानदार पथसंचलन सादर केले. पथसंचलनाचे नेतृत्व अग्निवीर राम गोयल व मेजर अभिषेक कश्यप यांनी केले. राष्ट्रध्वजावर हात ठेवून जवानांनी रेजिमेंट तसेच कुटुंबीयांचे नाव उंचावेल असे काम करून दाखविण्याची शपथ देण्यात आली. अग्निवीरांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, देशाच्या सैन्यदलातील एक सर्वात जुनी रेजिमेंट म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीची ओळख आहे. शिस्त व साहस यांच्या जोरावर या रेजिमेंटचे नाव उंचावले आहे. प्रत्येक जवानाच्या जीवनात शिस्त व आरोग्य महत्त्वाचे आहे. रेजिमेंटचे नाव सर्वत्र होईल अशी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रशिक्षणादरम्यान वैभव शामराव पाटील याला सर्वोत्तम अग्निवीर म्हणून गौरविण्यात आले.









