गोळीबारात एक जवान हुतात्मा; 10 जण जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसाचार दोन महिन्यानंतरही थांबण्याचे नाव घेत नाही. दोन समुदायांमधील हिंसाचार वाढत आहे. जमावाकडून हल्ले होण्याचे आणि शस्त्रलुटीचे प्रकार ठिकठिकाणी घडताना दिसत आहेत. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात जमावाने भारतीय राखीव बटालियनच्या छावणीतून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचा एक 27 वषीय जवान हुतात्मा झाला. जमावाने शस्त्रे आणि दारूगोळा लुटण्यासाठी खंगाबोक भागातील आयआरबी बटालियनच्या पॅम्पवर हल्ला चढवल्यानंतर ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर सैन्यासोबत चकमक सुरू झाली. सैन्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना प्रथम अश्रुधुराचा आणि नंतर रबर गोळ्यांचा वापर केला. मात्र, शस्त्रधारी जमावाने गोळीबार सुरू केल्याने एका जवानाला प्राण गमवावे लागले. चकमकीत इतर 10 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.









