पुणे / प्रतिनिधी :
व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील आणखी एकाला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. संबंधित गुन्हय़ात टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत टोळीतील दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मयूर जगदीश जगदाळे (वय 32, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुख्यात गज्या मारणे टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करीत तब्बल 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकासह गुन्हे शाखेने विविध ठिकाणाहून नऊ जणांना अटक केली होती. त्यांच्याविरूद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. टोळीतील फरारी कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार सुधीर इंगळे यांना मिळाली. त्यानुसार मयूर जगदाळे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पो, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, सुधीर इंगळे, तुषार भिवरकर, गणेश पाटोळे, इम्रान नदाफ यांनी केली.
अधिक वाचा : राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब









