मायणा न्हावेली येथील युवक गंभीर जखमी. बसला धडक दिल्यानंतर दुचाकीला कारची धडक. गतिरोधक घालण्याची मागणी.
डिचोली : डिचोली ते साखळी या मुख्य महामार्गावरील सर्वण बसस्टॉप जंक्शनवर अपघातांची मालिका सुरूच असून काल मंगळ. दि. 26 सप्टें. रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास अपघात होऊन मायणा न्हावेली साखळी येथील परेश नाईक हा युवक गंभीर जखमी झाला. सर्वण बसस्टॉप जंक्शनवर अपघात होतच असल्याने या रस्त्यावर गतिरोधक घालण्याची मागणी सर्वणवासीयांनी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार मायणा न्हावेली साखळी येथील परेश नाईक हा युवक आपल्या जीए 04 डी 8992 या स्प्लेंडर मोटरसायकलवरून डिचोलीतून साखळीच्या दिशेने जात असताना सर्वण बसस्थानकावर अचानक एक प्रवासी बस उभी राहिली. सदर बसही साखळीच्याच दिशेने जात होती. सदर बसचा अंदाज न आल्याने परेश नाईक याची मोटरसायकल थेट बसला मागाहून धडकली. या धडकेत परेश नाईक व दुचाकी दुस्रया बाजूने रस्त्यावर पडली. त्याचवेळी डिचोलीच्या दिशेने येण्राया चारचाकी गाडीची धडक मोटरसायकल व परेश नाईक याला बसली. या धडकेने त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतील परेश याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. व प्राथमिक उपचारानंतर त्याची रवानगी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात करण्यात आली.
पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रामदास तारी यांची तत्परता
सर्वण जंक्शनवर अपघात झाल्यानंतर परेश हा जखमी अवस्थेत सुमारे 15 मिनिटे जगेवरच पडून होता. त्याला कोणीही आपल्या गाडीतून इस्पितळात नेण्यास तयार नव्हते. 108 रूग्णवाहिका इतर कंलसाठी गेल्याने या वेळेत पोहोचू शकली नाही. त्यातच परेश याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरूच होता. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षक रामदास तारी यांनी जखमी अवस्थेतील परेश नाईक याला आपल्या वाहनातून डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या त्यांच्या कामगिरीचे डिचोली पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी कौतुक केले.
एका अपघातातून बरा झाला आणि दुस्रया अपघातात सापडला
अपघातात जखमी झालेल्या परेश नाईक याला गेल्या अडीच महिन्यांपूर्वी मोठा अपघात घडला होता. तो काम करत असलेल्या निर्ला या ठिकाणी एका कर्नाटक नोंदणीकृत गाडीने त्याला ठोकारून पळ काढला होता. त्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीवर त्याने बांबोळी व अन्य इस्पितळात दोन महिने उपचार घेतले होते. गेल्या पंधरा वीस दिवसांपूर्वीच तो घरातून बाहेर पडला होता. व कामाला जाऊ लागला होता. एका अपघातातून बरा झाल्यानंतर लगेचच त्याच्या नशिबी हा दुसरा अपघात आला. त्यातूनही तो सहिसलामत बरा व्हावा, अशी प्रार्थना यावेळी घटनास्थळी उपस्थित लोक करीत होते.
सर्वण जंक्शनवर गतिरोधक हवेच
साखळी ते डिचोली मार्गावरील सर्वण बसस्टॉप जंक्शन हे सध्या अत्यंत धोकादायक जंक्शन बनले आसून या जंक्शनवर अपघात सुरूच आहे. सर्वण गावातील अनेकांना या जंक्शनवरील धोकादायक वाहतुकीमुळे अपघात घडले आहेत. त्यामुळे या जंक्शनवरील रस्त्यावर गतिरोधक अत्यंत आवश्यक आहे. सरकारने याची दखल घेत मागणी पूर्ण करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी वासुदेव सावंत यांनी केली.
गतीरोधकाचा प्रस्ताव सरकारदरबारी – तन्वी सावंत
या धोकादायक जंक्शनवर वारंवार अपघात घडत असल्याने लोकांच्या मागणीनुसार गतिरोधक घालण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी सादर करण्यात आलेला आहे. त्याचा पाठपुरावा आपण घेत असून आमदरांनीही या विषयात लक्ष घालावे. अशी मागणी उपसरपंचा तथा स्थानिक पंचसदस्य तन्वी सावंत यांनी केली आहे.









