नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने आणखी 16 युटय़ूब वृत्त वाहिन्यांवर बंदी घातली आहे. यांमध्ये सहा पाकिस्तानी वाहिन्यांचाही समावेश आहे. देशात विविध समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल, अशी वृत्ते प्रसिद्ध करणे, समाजात भीती निर्माण होईल अशा पद्धतीने वृत्तांकन करणे आणि कायदा-सुव्यवस्था स्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करणे यासाठी ही बंदी घालण्यात आली.
देशाची सुरक्षा, परराष्ट्रसंबंध, धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता यांना धोका पोहचविणारी वृत्ते आणि बनावट माहिती या वृत्त वाहिन्यांवरुन प्रसारित केली जात होती. या वृत्त वाहिन्यांनी त्यांची माहिती नियमानुसार माहिती आणि प्रसारण विभागाकडे दिली नव्हती. काही वृत्तवाहिन्यांवरुन विशिष्ट समुदायाचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला जात होता. तर विविध धर्मियांमध्ये तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या वाहिन्यांनी चालविला होता, असे प्रतिपादन करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी याच कारणास्तव 78 युटय़ूब वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली होती. आता आणखी 16 वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे एकंदर 94 वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बंदी घालण्यात आलेल्या वृत्तवाहिन्या…
भारतीय वृत्तवाहिन्या- सैनी एज्युकेशन रीसर्च, हिंदी मे देखो, टेक्निकल योगेंद्र, आज ते न्यूज, एसबीबी न्यूज, डिफेन्स न्यूज 24ƒ7, द स्टडी टाईम, लेटेस्ट अपडेट, एमआरएफ टीव्ही लाईव्ह, तहफूझ ए दिन इंडिया.
पाकिस्तानी वृत्तवाहिन्या- आज तक पाकिस्तान, डिस्कव्हर पॉईंट, रिऍलिटी चेक्स, कैसर खान, द व्हॉईस ऑफ एशिया, बोल मिडिया बोल.









