कर्नाटकातील कुर्ग जिल्हय़ातील संपत्तीचाही समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) काँगेसचे खासदार आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांची 11.04 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई आयएनएक्स मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकृत वक्तव्यात मंगळवारी देण्यात आली. सध्या 4 ठिकाणची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यात कर्नाटकातील कुर्ग जिल्हय़ातील संपत्तीचा समावेश आहे.
मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार ईडीने ही मालमत्ता जप्त केली. कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात अंतरिम आदेश देण्यात आला होता. कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांना आयएनएक्स घोटाळा प्रकरणी अटकही करण्यात आली होती. सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपासयंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. पी. चिदंबरम यांच्यावरही या प्रकरणात कारवाई झालेली आहे.
काय आहे प्रकरण
कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स मिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बेकायदा पैसा उकळल्याचा आरोप आहे. हे प्रकरण मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातील आहे. त्या काळात पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांच्या विभागाच्या अंतर्गत काम करणाऱया विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या व्यवहाराला मान्यता दिली होती. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप-रालोआ सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास आरंभ केला. त्यानंतर आता ही मालमत्ता जप्तीची कारवाई झाली आहे.









