अयोध्येतील मंत्रमुग्ध करणारं दृश्य : रामनवमी निमित्त भाविकांची अलोट गर्दी
वृत्तसंस्था/ अयोध्या
रामनवमीनिमित्त तीर्थनगरी अयोध्येमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची रविवारी अलोट गर्दी झाली. लाखोंच्या संख्येत भाविक अयोध्येत पोहोचले. रामनवमीला ठिक 12 वाजता रामलल्लावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आहे. या सूर्यतिलकाचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी लाखेंच्या संख्येत भाविक देशभरातून अयोध्येत पोहोचले होते. या सूर्याभिषेकाचे थेट प्रसारण दूरदर्शन आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर करण्यात आले.
जन्मोत्सवाच्या एक दिवस आधीच म्हणजे शनिवारीच लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले. शरयू नदीत स्नान केल्यावर मठ-मंदिरांमध्ये दर्शन-पूजन करत भाविक धार्मिक विधींमध्ये भाग घेत होते. रामलल्लाच्या जन्मोत्सवानिमित्त अयोध्येत मठ-मंदिरांमध्ये भजन-कीर्तनांचे आयोजन करण्यात आले.
पवित्र शरयूत स्नानासोबत अयोध्येत रामनवमीच्या पर्वाचा उत्सव सुरू झाला. रविवारी पहाटेपासूनच देशविदेशातून पोहोचलेले भाविक शरयू नदीत पवित्र स्नान करण्यासाठी विविध घाटांवर पोहोचले हेते. जय श्री राम असा उद्घोष यावेळी भाविकांकडून करण्यात आला. शरयू स्नानानंतर भाविक नागेश्वर नाथ, हनुमानगढी, कनक भवन आणि राम मंदिराच्या दिशेने रवाना झाले. यादरम्यान शरयूच्या घाटांवर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह विशेष पोलिसांना तैनात करण्यात आले होते. तर राम मंदिरात दर्शन पूजनास प्रारंभ झाल्यावर मंदिर परिसराबाहेर भाविकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. राम मंदिरासह हनुमानगढीमध्ये देखील मोठ्या संख्येत भाविक दाखल झाले होते.
अयोध्येत किरणोत्सव
रामनवमीनिमित्त अयोध्येत रामलल्लाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्ताला रामलल्लाचा सूर्याभिषेक झाला. सुमारे 4 मिनिटे रामलल्लाच्या मस्तकावर सूर्याची किरणे पडली. सूर्यतिलकानंतर रामलल्लाची आरती करण्यात आली. अयोध्येत सध्या सुमारे 5 लाख भाविक आहेत. राम जन्मभूमी परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले आहे.
शरयू घाट उजळला
रामनवमीनिमित्त यंदा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शरयूच्या घाटांवर 2 लाख दिवे लावण्यात आले. मंदिर परिसराच्या सुरक्षेकरिता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. एक हजाराहून अधिक सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात आली. ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात आहे.
अन्सारी यांच्याकडून शुभेच्छा
बाबरीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीही भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी भाविकांवर पुष्पवर्षाव केला. अयोध्या धर्म आणि देवी-देवतांची भूमी आहे. रामनवमी शतकांपासून अयोध्येत साजरी करण्यात येत आहे. आमच्या देशात हिंदू आणि मुस्लिमांदरम्यान बंधुभाव असून आम्ही गंगा-यमुना संस्कृतीचा सन्मान करतो, असे उद्गार अन्सारी यांनी काढले आहेत.









