दाणोलीसह देवसू व केसरी तीन गावांचे देवस्थान
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली गावचे ग्रामदैवत श्री लिंग माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. दाणोलीसह देवसू व केसरी या तीन गावांचे देवस्थान असल्यामुळे या उत्सवात हजारो भाविक लिंग माऊली चरणी नतमस्तक होतात. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या आणि माहेरवाशिणीची पाठीराखी असलेल्या लिंग माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त सकाळी मंदिरात पुजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर लिंग माऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार आणि आकर्षक फुलानी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर तीन गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दाणोली देवस्थानचे सर्व मानकरी आणि ग्रामस्थांनी केले आहे.









