प्रतिनिधी / बेळगाव
जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचा (जेएनएमसी) वार्षिक दिन समारंभ 21 रोजी साजरा करण्यात आला. यादिनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीकरिता गौरव करण्यात आला. प्रारंभी प्रमुख अतिथींचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर 2021-2022 च्या विद्यार्थी मंडळाने त्याची अधिकारसूत्रे 2022-2023 च्या विद्यार्थी मंडळाकडे सोपविली. त्यानंतर विविध विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुबोध केरकर यांचे भाषण झाले. त्यांनी भाषणात व्यक्त केलेल्या विचारांमुळे सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यांनी समुद्रासंबंधीच्या त्यांच्या काही कलाकृती आणि मच्छीमारांच्या जीवनशैलीविषयीच्या कलाकृतींचे दर्शन घडविले. सर्वांनाच या कलाकृती पाहून कौतुक वाटले. कार्यक्रमाची सांगता प्राचार्यांच्या भाषणाने झाली. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.









