हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, अष्टपैलू दीप्ती शर्माला ए श्रेणीत स्थान
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (27 एप्रिल) महिला क्रिकेटरच्या वार्षिक (2022-23) करार घोषणा केली आहे. नव्या केंद्रीय करारानुसार 17 खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले असून ए, बी आणि सी या तीन ग्रेडमध्ये महिला खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या तीन खेळाडूंचा बीसीसीआयने ए ग्रेडमध्ये समावेश केला आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या करारानुसार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या महिला क्रिकेटपटूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. यानंतर 5 खेळाडूंना बी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर, फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड, सलामीवीर शेफाली वर्मा, रिचा घोष आणी जेमिमा रॉड्रिग्स यांचा समावेश करण्यात आला आहे. बी श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक 30 लाख तर सी श्रेणीतील खेळाडूंना 10 लाख रुपये मिळणार आहेत.
या खेळाडूंना करारात स्थान नाही
नव्या करारानुसार पूनम यादव, तानिया भाटिया, पूनम राऊत, शिखा पांडे, अरुंधती रे•ाr या महिला खेळाडूंना यावर्षी कोणत्याही श्रेणीमध्ये स्थान मिळालेले नाही. याशिवाय राजेश्वरी गायकवाड हिची अ श्रेणीतून ब श्रेणीत घसरण झाली आहे तर पूजा वस्त्राकर हिची ब श्रेणीतून क श्रेणीत पाठवण्यात आले आहे. नव्या करारामध्ये 7 खेळाडूंना प्रथम स्थान मिळाले आहे. ज्यात रेणुका ठाकूर, मेघना सिंग, देविका वैद्य, एस. मेघना, अंजली सरवानी, राधा यादव, यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे.
- ए ग्रेड (50 लाख रुपये) – हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा
- बी ग्रेड (30 लाख रुपये) – रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष आणि राजेश्वरी गायकवाड
- सी ग्रेड (10 लाख रुपये) – मेघना सिंग, देविका वैद्य, एस मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यास्तिका भाटिया.









