भारतीय संघ मायदेशात 10 तर विदेशात 9 सामने खेळणार
वृत्तसंस्था/ लंडन
रविवारी ओव्हलवर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत जेतेपद पटकावले. यानंतर लगेचच आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्राची घोषणा केली आहे. भारतीय संघ 2023-2025 या कालावधीत एकूण 6 मालिका आणि 19 कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघ 2023-25 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. याशिवाय टीम इंडियाला पुढील दोन वर्षांत आणखी दोन परदेशी कसोटी मालिका आणि तीन देशांतर्गत कसोटी मालिका खेळायच्या आहेत. परदेशात भारतीय संघाची मालिका ऑस्ट्रेलिया, विंडीज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. मायदेशात भारत इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशविरुद्ध मालिका खेळणार आहे. सलग दोन सत्रात भारतीय संघाला अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तिसऱ्या सत्रात भारताच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.









