मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती ः गतवर्षीप्रमाणे नुकसानग्रस्तांना मिळणार मदत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनांकडून मागविला आहे. याच्या आधारे गतवर्षीप्रमाणे यंदाही एनडीआरएफ/एसडीआरएफ मार्गसूची दरापेक्षा अधिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे.
पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने मलनाड आणि किनारपट्टी भागात पावसामुळे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी आणि बुधवारी कोडगू, मंगळूर आणि उडुपी जिल्हय़ांमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या पाठोपाठ राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांसाठी यंदा देखील केंद्र सरकारच्या एनडीआयएफ/एसडीआरएफ मार्गसूचीपेक्षा अतिरिक्त मदतनिधी जाहीर केली आहे.
जीवित हानी झाल्यास एनडीआरएफ/एसडीआरएफ मार्गसूचीनुसार 4 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ही रक्कम 5 लाख रुपये निश्चित केली आहे. पावसामुळे घरात पाणी शिरून किंवा पुरामुळे नुकसान झाल्यास एनडीआरएफनुसार 3,200 रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारकडून त्यामध्ये अतिरिक्त 6,800 रु. समाविष्ट करून एकूण 10 हजार रुपये देण्यात येणार आहे.
सरकारने पावसामुळे घरे कोसळलेल्यांना मदत देण्यासाठी अ, ब, क अशी वर्गवारी केली आहे. अ गटातील घरांचे नुकसान झालेल्यांना 5 लाख रु., ब गटासाठी 3 लाख रु., क गटासाठी 50 हजार रु. मदत देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून अ वर्गात येणाऱया नुकसानग्रस्तांना 95 हजार 100 रु., निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकार अतिरिक्त 4 लाख रु. देणार आहे. ब गटासाठी केंद्राकडून 95 हजार 100 रु. निश्चित करण्यात आले आहे. तर राज्य सरकार 2 लाख रु. अतिरिक्त देत आहे आणि क गटात 5 हजार 200 रु. निश्चित केले आहे. मात्र, राज्य सरकार 50 हजार रु. देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली.
इनपुट साहाय्यधन
पीक हानीसंदर्भात इनपुट साहाय्यधन कोरडवाहू जमिनींवरील शेतीसाठी एनडीआरएफकडून 6,800 कोटी रु. देण्यात येते. राज्य सरकार त्यामध्ये आणखी 6,800 रु. समाविष्ट करून एकूण 13,600 रुपये देत आहे. पाणलोट क्षेत्रातील पिकांना केंद्राकडून हेक्टरी 13,500 रु. मिळतात. तर राज्य सरकार 25 हजार रु. देत आहे. बागायती पिकांचे नुकसान झाल्यास केंद्राकडून हेक्टरी 18 हजार रु. आणि राज्य सरकारकडून 28 हजार रु. भरपाई दिली जाते. शेतकऱयांच्या कल्याणासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून अतिरिक्त मदत देण्यात येत आहे, असेही बोम्माई यांनी म्हटले आहे.
पूरग्रस्त भागांसाठी 500 कोटी देणार
अतिवृष्टी, पुरामुळे हानी झालेल्या सर्व जिल्हय़ांचा अहवाल आला आहे. त्यामुळे विद्युत संपर्क, रस्ते दुरुस्ती, पूल बांधणी अशा कामांसाठी तातडीने 500 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. पावसामुळे हानी झालेल्या उडुपी जिल्हय़ातील विविध भागांना भेटी दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पाहणी करून आवश्यकतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येईल. पूरपरिस्थितीशी युद्धपातळीवर सामना करण्यासाठी अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि आमदार सज्ज आहेत. गेल्या वर्षी 14 लाख हेक्टर प्रदेशातील पीक नुकसान भरपाई म्हणून 1,600 कोटी रुपये एका महिन्यात मंजूर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदा देखील भरपाई देण्यात येईल. जिल्हा प्रशासनांकडून अहवाल आणि अंदाजपत्रक आल्यानंतर केंद्र सरकारकडे भरपाई मंजूर करण्यासाठी विनंती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी अतिरिक्त मदत
विषय वर्ग एनडीआयएफ/एसडीआरएफ मार्गसूची दर मदतीची वाढीव रक्कम
@ जीवितहानी 4 लाख रु. 5 लाख रु.
@ पुराचे पाणी शिरून गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान 3,800 रु. 10 हजार रु.
@ 75 टक्क्यांहून अधिक घर कोसळल्यास अ 95,100 रु. 5 लाख रु.
@ 25 ते 75 टक्के घर कोसळल्यास ब 1 95,100 रु. 5 लाख रु.
(पूर्णपणे पाडून नवीन बांधण्यासाठी)
@ 25 ते 75 टक्के घर कोसळल्यास (दुरुस्ती) ब2 95,100 रु. 3 लाख रु.
@ 15 ते 25 टक्के घर कोसळल्यास क 5,200 रु. 50 हजार रु.









