वृत्तसंस्था/ मुंबई
भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा शुक्रवारी केली. या स्पर्धेच्या साखळी फेरीसाठी एकूण 20 अधिकाऱ्यांची घोषणा केली असून बाद फेरीसाठी अधिकाऱ्यांची घोषणा नंतर केली जाईल, अशी माहितीही आयसीसीने दिली. निवड झालेल्यामध्ये 16 पंच आणि 4 सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच या यादीत भारताच्या दोघांची नावे आहेत. यात पंच म्हणून नितीन मेनन असणार आहेत, तर सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथ असणार आहे.
आयसीसीने निवडलेल्या 16 पंचांच्या यादीत 12 पंच हे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील आहेत, तर 4 पंच आयसीसीच्या उदयोन्मुख पंचांच्या पॅनेलमधील आहेत. याचबरोबर न्यूझीलंडचे जेफ क्रो, झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट, वेस्ट इंडिजचे रिची रचर्डसन आणि भारताचे जवागल श्रीनाथ हे चार सामनाधिकारी असणार आहेत.
पंचांच्या एलिट पॅनेलमधील क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मराइस इरास्मस (दक्षिण आफ्रिका), मायकेल गॉफ (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्ट इंडिज), अहसान रझा (पाकिस्तान) आणि एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) या पंचाचा समावेश आहे. तसेच आयसीसीच्या उदयोन्मुख पंचांच्या पॅनेलमधील शरफुद्दौला शाहिद (बांगलादेश), पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), अॅलेक्स व्हार्फ (इंग्लंड) आणि ख्रिस ब्राऊन (न्यूझीलंड) या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, या पंचांमधील धर्मसेना, इरास्मस आणि टकर हे तीन असे पंच आहेत, ज्यांनी 2019 वर्ल्डकपमध्येही काम पाहिले आहे.









