ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालना ही राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जालना महापालिका करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवला होता. हा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याने यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश दिले.
केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जून खोतकर या महापालिकेसाठी आग्रही होते. शहराची वाढती लोकसंख्या आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी, यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. या पाठपुराव्याला आज यश आलं.








