28 जुलै-ऑगस्ट 10 पर्यंत चेन्नईत होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ चेन्नई
जुलैमध्ये येथे होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ फेरडेशनने 20 सदस्यांचे आजवरचे सर्वात मोठे पथक जाहीर केले आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा येथे होणार आहे.
भारत या स्पर्धेचा यजमान असल्याने त्यांना खुल्या गटासाठी तसेच महिलांच्या विभागात दोन संघ उतरवण्याची मुभा प्रथमच मिळणार आहे. 14 दिवस चालणाऱया या स्पर्धेत यामुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा बळावल्या आहेत. 150 देशातील जगातील अव्वल स्पर्धक यात सहभागी होण्याची अपेक्षा केली आहे.
ओपन विभागातील पहिल्या पथकात विदित गुजराथीसह पी. हरिकृष्ण व चेन्नईचा कृष्णन शशिकिरण यांचा समावेश आहे. 2020 मधील स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळविले होते. त्यात विदित गुजराथीचा महत्त्वाचा वाटा होता. के. शशिकिरणने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 19 वर्षीय अर्जुन एरिगैसी व एसएल नारायणन यांना पहिल्या संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात अर्जुनने प्रभावी कामगिरी केली असून या स्पर्धेत तो प्रथमच खेळणार असल्याने त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल. नारायणनही या स्पर्धेत पदार्पण करीत असून त्याची भक्कमपणे खेळण्याची पद्धत प्रभावी ठरली आहे.
दुसऱया पथकात गेल्या दोन वर्षात लक्षवेधी कामगिरी केलेल्या युवा प्रतिभावान खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. त्यात आर. प्रज्ञानंद, आर. निहाल सरिन, डी. गुकेश, रौनक साधवानी यांचा समावेश आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ते पदार्पण करणार आहेत. याशिवाय बी.अधिबन या अनुभवी खेळाडूचाही यात समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये भारताने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. त्या संघाचा बी.अधिबन हा एक सदस्य होता.
‘बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दोन संघ उतरवण्याची संधी मिळाल्याने युवा प्रतिभावंत खेळाडूंना या सर्वोच्च व्यासपीठावर आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळण्यासाठी त्यांना कदाचित आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. कारकिर्दीत इतक्या लवकर या स्पर्धेत खेळण्याची त्यांना फार मोठी संधी मिळली आहे. भारताचे दोन्ही संघ मजबूत असून त्यात युवा व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. या संधीचे ते सोने करतील, अशी मला आशा वाटते. या स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत,’ असे एआयसीएफ सचिव भरत सिंग चौहान म्हणाले.
भारताच्या महिला संघात अतिशय प्रतिभावान असलेली अनुभवी कोनेरू हंपी, जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असणारी द्रोणावली हरिका, तानिया सचदेवसह आर. वैशाली, भक्ती कुलकर्णी यांचा पहिल्या संघात समावेश करण्यात आला आहे. भक्ती कुलकर्णीची ही पहिलीच बुद्धिबळ ऑलिम्पियाड असेल. महिलांच्या दुसऱया संघात राष्ट्रीय चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन, मेरी ऍन गोम्स, पद्मिनी राऊत, वंतिका अगरवाल व 15 वर्षीय दिव्या देशमुख यांचा समवेश आहे.
पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. पण तो या संघांचा मेन्टर म्हणून काम पाहणार असल्याने त्यांच्यासोबतच असेल. ‘मी अलीकडे फार कमी स्पर्धांत खेळत असून यापूर्वी अनेकदा मी ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला असल्याने आता युवा प्रतिभेला संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. भारताकडे निहाल, प्रज्ञानंद, गुकेश, अर्जुन यासारखे अनेक गुणवान खेळाडू आहेत,’ असे आनंद म्हणाला.
प्रज्ञानंद व आर. वैशाली हे भाऊ-बहीण असून एकाच ऑलिम्पियाडमध्ये भाऊ-बहीण खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एन. सरिता व एन. सुधाकर बाबू या बहिण-भावानी 1988 मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा त्यावेळी ग्रीसमध्ये झाली होती. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे भारतीय पथकाचे प्रमुख असतील. ग्रँडमास्टर श्रीनाथ व ग्रँडमास्टर आरबी रमेश अनुक्रमे पहिल्या व दुसऱया संघाचे प्रशिक्षक असतील. अभिजीत कुंटे हे महिलांच्या पहिल्या संघाचे तर स्वप्नील धोपाडे हे दुसऱया संघाचे प्रशिक्षक असतील. 2014 मध्ये झालेल्या ट्रोमसो बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने कांस्य मिळविले होते तर 2020 मध्ये झालेल्या व्हर्च्युअल स्पर्धेत भारत व रशिया यांना संयुक्त सुवर्णपदक आणि 2021 मध्ये महिला संघाला कांस्यपदक मिळाले होते.









