वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) 2022 सालातील प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कार विजेत्यांची घोषणा सोमवारपासून प्रारंभ होत असल्याची माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली.
आयसीसीतर्फे विविध वयोगटात तसेच पुरुष आणि महिलांच्या विभागात 2022 च्या कालावधीत सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जातो. सोमवार दि. 23 जानेवारीपासून पुरस्कार विजेत्यांच्या घोषणेला प्रारंभ होईल. 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱया पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची आयसीसीतर्फे मतदानाद्वारे निवड केली जाते. आयसीसीतर्फे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावेळी 13 विविध गटातील क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स चषक तर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी रॅचेल हेओई फ्लिंट चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 2022 सालाच्या क्रिकेट हंगामातील आयसीसीतर्फे पाच सर्वोत्तम संघाची निवड स्वतंत्र पॅनेलद्वारे केली जाणार आहे. या पॅनेलमध्ये प्रसार माध्यमातील सदस्यांचा समावेश आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 दरम्यानच्या क्रिकेट हंगामातील झालेल्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेऊनच आयसीसीतर्फे हे विविध पुरस्कार दिले जातात.
23 आणि 24 जानेवारी रोजी सर्वोत्तम संघांची घोषणा करण्यात येणार आहे. 23 जानेवारी सोमवारी टी-20 प्रकारातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघांची घोषणा होणार आहे. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलांच्या वनडे संघांची, पुरुष कसोटी संघांची घोषणा मंगळवार 24 जानेवारीला केली जाईल. बुधवारी 25 जानेवारी रोजी 13 वैयक्तिक विभागातील पुरस्कारांची घोषणा होणार आहे. त्याचप्रमाणे टी-20 तसेच हंगामातील सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटूची घोषणा केली जाईल. गुरुवार 26 जानेवारी हा या घोषणा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस राहिल. या दिवशी आयसीसीतर्फे सर्वोत्तम पंचाची निवड, पुरुष आणि महिलांच्या सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूंची निवड तसेच पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूची घोषणा करण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी रॅचेल फ्लिंट चषक पुरस्कार मिळवणाऱया तसेच सर गारफिल्ड सोबर्स चषक मिळवणाऱया महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची घोषणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शेवटच्या दिवशी आयसीसीच्या स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्काराची घोषणाही केली जाईल.









