काजू उत्पादक शेतकऱ्यांची मागणी : आधारभूत किंमत मिळत नसल्याने उत्पादकांना दरवर्षी मोठा फटका
► प्रतिनिधी / बेळगाव
गोवा राज्य सरकारने काजूसाठी किमान आधारभूत दर प्रति किलो 170 रुपये निश्चित केला आहे. त्याप्रमाणे कर्नाटक सरकारनेही काजूला आधारभूत दर जाहीर करावा, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर व हुक्केरी तालुक्यातील काही भागात काजूचे उत्पादन होते. मात्र काजू विक्रीसाठी बाजारपेठ आणि आधारभूत किंमत मिळत नसल्याने उत्पादकांना दरवर्षी फटका बसू लागला आहे. त्यामुळे आधारभूत किमत मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
गोवा सरकारने काजूला आधारभूत किमत 150 रुपयांवरून प्रति किलो 170 रुपये निश्चित केली आहे. त्यामुळे गोव्यातील काजू उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याप्रमाणेच कर्नाटक सरकारनेही काजूला आधारभूत किमत जाहीर करावी. काजू हंगामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यानंतर काजू उत्पादनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांसमोर काजू विक्रीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी शासनाने आताच आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरात काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्या
बेळगाव खानापूर तालुक्यात काजूचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षांत काजूचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. मात्र दरवर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित दरापासून दूर रहावे लागत आहे. मिळेल त्या किमतीला काजू विक्री करावी लागत आहे. यात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. विशेषत: बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना शेजारी चंदगड तालुक्यावर अवलंबून रहावे लागते. चंदगड तालुक्यात भरणाऱ्या आठवडी बाजारात काजूची विक्री करावी लागते. यासाठी बेळगाव शहरात काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही काही वर्षांपासून होत आहे.









